’मनावर आवर घातला की जगणे सुंदर होते’   

डॉ. वर्षा तोडमल यांचे प्रतिपादन 

पुणे : शरीर आणि मन या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. मन हे शरीराचा वापर करून घेत असते. त्यामुळे मनावर आवर घातला, तर भावनांवरही आवर घालता येतो. त्यातून मनावरचा ताण कमी होतो. मन आणि शरीर निरोगी राहिल्याने जगणे आनंदी होते. त्यासाठी केवळ आपला विचारांचा आणि कृतीचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे. असे मत प्रसिद्ध लेखिका डॉ. वर्षा तोडमल यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. 
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्राचे दुसरे पुष्प डॉ. वर्षा तोडमल यांनी यांनी ‘आरोग्य : शरीराचे आणि मनाचे’ या विषयावर गुंफले. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रत्येकाला आवड असते. त्या आवडीसाठी सवड काढावी लागते. आपल्या संपत्तीचे निर्माते आणि उपभोक्ते आपणच असतो. त्यामुळे चांगल्याचा स्वीकार आणि वाईटाला नकार देता आला पाहिजे, असेही डॉ. तोडमल यांनी नमूद केले.   
 
डॉ. तोडमल म्हणाल्या, सत्ता आणि संपत्तीमुळे मनाची शक्ती दुबळी होते. राग, लोभ, मत्सरातून आपली शक्ती खर्ची होते. तसेच नकारात्मक विचार हे मनासह वातावरणात टिकतात. त्याचा परिणामही आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे आपण आपल्या मनाचे आणि शरीराचे आरोग्य वेळोवेळी तपासून मनाची शक्ती वाढविली पाहिजे. ताण हा नेहमीच येताना सहज येतो. मात्र नंतर तो भावना आणि शरीरावर परिणाम करण्यास सुरूवात करतो. त्यातूनच शरीराप्रमाणे आपले मनही आजारी पडते. त्यामुळे आपण शरीराप्रमाणे मनाच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. मनाची काळजी घेतली पाहिजे, असेही डॉ. तोडमल यांनी स्पष्ट केले.
 
अकारण ज्या गोष्टींचा ताण मनामध्ये निर्माण होतो, त्या गोष्टी टाळता आल्या पाहिजे. सदाचाराने मन सामर्थ्यमान होते. सत्याने मनाचे तेज वाढत असते. मनाला प्रसन्न ठेवायचे की त्याला गंजू द्यायचे हे आपल्याच हातात असते. प्रत्येक मानवाला राग येतो. मात्र हा राग निरर्थक नसतो. राग मानवी आयुष्यात काही ठिकाणी उपयुक्तही असतो. त्यामुळे राग हा क्षणिक असावा लागतो. मनात निर्माण झालेल्या रागाला आपण वेळीच न जाळल्यास तो तुम्हाला जाळत असतो. त्यामुळे मानवाला रागाचे रूपांतर धैर्यात करता आले पाहिजे. निसर्गात न्याय असतो. अन्याय हा निसर्गाला मान्य नाही. त्यामुळे शरीराचे आणि मनाचे आरोग्य सांभाळता आले पाहिजे. छोट्या गोष्टींमध्ये मनुष्य गुंतून पडतो. सत्ता, संपत्ती, तुलना करतो. त्यात अडकत जातो. त्यातून शरीराची शक्ती खर्ची होते. त्यावर उपाय म्हणून भावनांवर ताबा मिळविला पाहिजे. भावना शरीरावर काय परिणाम करतात, हे आपल्याला बाहेरून जाणवत नाही. मनाचे आरोग्य आपणास राखता आले, तर जगणे सुंदर होते, असेही डॉ. वर्षा तोडमल यांनी सांगितले. अरूंधती कुंभारीकर-भाले यांनी सूत्रसंचालन केले. वसंत व्याख्यानमाला २० मे पर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता टिळक स्मारक मंदिरात होईल. व्याख्यानमाला विनामूल्य आणि सर्वांसाठी खुली आहे. 
 

Related Articles